कराड प्रतिनिधी । ट्रकने पुण्याहून कोल्हापूरला जाताना पैशांसाठी प्रवाशाचा खून केल्याप्रकरणी ट्रक चालकास दोषी धरून जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांनी सुनावली. संदीप शिवशंकराप्पा बुडगी (रा. बावीकेरे, ता. निलमंगला, जि. बेळगाव, सध्या रा. मुद्दापुरा, ता. जि. चित्रदुर्ग, कर्नाटक), असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. स्वप्नील गणेश सुतार (रा. पेठवडगांव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याचा ट्रक चालकाने चाकूने गळ्यावर वार करून खून केला होता.
या खटल्याची हकीकत अशी की, स्वप्नील गणेश सुतार (रा. सोनार्ली वसाहत, पेठवडगांव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) हा मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी कोल्हापूरला जाण्यासाठी पुणे बायपास नवले ब्रीज येथे थांबला होता. त्याचा मित्र करण बाबर याने त्याला कोल्हापूरकडे निघालेल्या एका आयशर टेम्पोमध्ये बसवले. रात्री साताऱ्यात आल्यानंतर ट्रकमधील अन्य प्रवासी उतरले. स्वप्नील सुतार आणि आरोपी असे दोघेच ट्रकमध्ये होते. कराडजवळ आल्यानंतर आरोपीने हायवेच्या सर्व्हिस रोडवर टेम्पो उभा करून प्रवाशी स्वप्नील सुतार याच्याकडे पैसे आणि किंमती वस्तुची मागणी केली.
तो पैसे आणि बॅग देत नाही म्हणून आरोपी ट्रक चालकाने चाकुचा धाक दाखवून त्याचे दोन्ही हात चिकटपट्टीने बांधून गाडीतून खाली उतरवले. जबरदस्तीने बॅग घेवुन त्याला ऊसाचे शेतात ओढत नेले. तो ओरडू लागल्याने आरोपीने चाकुने स्वप्नीलच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला. मृतदेह शेतात टाकून बॅगेतील साहित्य घेवून आरोपी पसार झाला होता.
याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी संदीप शिवशंकराप्पा बुडगी याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी एकूण १८ साक्षीदार तपासले. मयताचा मित्र करण सुभाष बाबर याची साक्ष महत्वाची ठरली. वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एल. कुराडे व डॉ. एस. जे. सावंत, तपास अधिकारी आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक क्षिरसागर यांची साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा दिली.