सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. चार दिवसांपासून संततधार मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे चोवीस तासांत १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वरात आतापर्यंत ८७०.६० मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागातून देण्यात आली.
महाबळेश्वरमध्ये सोमवार सकाळपासून मुसळधार पावसाची संततधार सुरूच होती. संध्याकाळी पाचपासून पावसाचा जोर कमी झाला होता. महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठेमध्ये पावसामुळे शुकशुकाट जाणवू लागला आहे. ठिकठिकाणी कोळशाच्या शेगडी पेटवून स्थानिक नागरिक शेकोटीचा आनंद घेत होते. तर मुसळधार पावसाच्या सरीमध्ये पर्यटक, दुचाकीस्वार पाऊस अंगावर झेलण्यासाठी अन् धुक्याच्या दुलईचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी काही हौशी पर्यटकांची तुरळक गर्दी पर्यटननगरीकडे वळू लागली आहेत.
महाबळेश्वर शहरातील नामांकित कपड्याच्या दुकानामध्ये सेल लागल्यामुळे बाजार पेठ परिसरात पर्यटक व स्थानिक नागरिकाची दुकानामध्ये तुबंळ गर्दी दिसून येत आहे. लिंगमळा धबधबा या परिसरातील भागात निसर्गाचं वरदान लाभलं असून, येथील हिरवीगार वृक्षराजी, उंचच-उंच डोंगर रांगा, त्यातून फेसाळणारा जलप्रपात, पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देतात. पावसाळा सुरू झाल्यापासून तर येथील निसर्ग हिरवाईने भरून गेला आहे.