मोरणा विभागामध्ये बिबट्याची पुन्हा डरकाळी; पशुपालनासह शेतीपूरक व्यवसाय अडचणीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोरणा विभागात बिबट्याच्या वावरामुळे शेती आणि पूरक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. बिबट्याकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोरणा – विभागातील नोटोशी, कुसरूंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. त्याच्या डरकाळीने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतशिवारात जाणे बंद केल्यामुळे शेती, दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.

मोरणा विभागातील नोटोशी, कुसरूंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग हीं सर्व गावे डोंगराच्या पायथ्याशी वसली आहेत. या गावातील सर्व पाळीव जनावरे चरण्यासाठी डोंगरावर नेली जातात. याबरोबरच मोरणा प्रकल्पामुळे नदीला पाणी असल्याने त्यावर चारही गावांतील लोकांकडून नदीकाठी बागायती शेती केली जात आहे.

या विभागात ग्रामस्थांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून काही महिन्यांत अनेक जनावरांवर हल्ला करून बिबट्याने त्यांचा फडशा पाडला आहे. जनावरे ठार केल्यानंतर वन विभाग त्याठिकाणी पंचनामा करतो. काही शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई मिळते. मात्र, नुकसानभरपाईपेक्षा बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणे गरजेचे आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.