पाटण प्रतिनिधी | चाफळ विभागातील कवठेकरवाडी येथील गावात रविवारी रात्री नऊ वाजता बिबट्याने प्रवेश केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाचे कर्मचारी व तरुणांनी एकत्र येऊन बिबट्याला हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र रात्रभर ग्रामस्थांना भिंतीच्या छायेखाली राहून रात्र काढावी लागली. मात्र असे असले तरी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चाफळ व परिसरात काही दिवसांपासून बिबट्याची दहशत पुन्हा एकदा वाढू लागली आहे. रविवारी वि रात्री नऊ वाजता कवठेकरवाडी गावात बिबट्या घुसला असल्याची म चाहूल लागताच कुत्री मोठमोठ्याने ए ओरडू लागली. यावेळी विजय ि कवठेकर या युवकांस बिबट्या दिसल्याने त्यांनी लगेच गावातील अबू कवठेकर, रामचंद्र कवठेकर, विलास कवठेकर, अमोल कवठेकर, शहाजी कवठेकर व इतर युवकांना फोन करून माहिती दिली. तसेच वनविभागालाही याबाबतची माहिती दिली. सर्व युवक एकत्र जमून परिसरात गस्त घालून बिबट्याला हुसकावून लावले.
चाफळ विभागात गेल्या अनेक महिन्यापासून वाड्यावस्त्यावर एकापेक्षा अधिक बिबट्या व त्यांची पिल्ले असल्याचे आढळून आले आहे. गत वर्षभरात बिबट्यांनी जवळपास विभागातील तीस ते चाळीस पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांना ठार केले आहे. मात्र यातील किती लोकांना नुकसानभरपाई दिली गेली हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे. रविवारी रात्री नऊ वाजता कवठेकरवाडी गावात बिबट्याचा थरार ग्रामस्थांना पहावयास मिळाला. वनविभागाचे अधिकाऱ्यांनी गावात येऊन शेतात उठलेल्या पायाच्या ठसा वरुन हा बिबट्या चार ते पाच वर्षांचा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मात्र, असे असले तरी दुसरीकडे या बिबट्याला पकडण्यासाठी चार वर्षापूर्वी वनविभागाने शिंगणवाडी याठिकाणी पिंजराही लावला होता. पण बिबट्या सापडला नाही. सध्या हा पिंजरा बंद अवस्थेत एका शेताच्या कडेला ठेवलेला असल्याने तो फक्त एक शोभेची वस्तू ठरला आहे. वनविभागाच्या उदासीनतेमुळे बिबट्याला पकडण्यात अपयश आल्याचे बोलले जात आहे. पिंजरा लावल्यानंतर बरेच दिवसापासून हा बिबट्याही गायब झाला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला होता.
यानंतर आत्ता चाफळसह परिसरात अनेक बिबट्यांचा वावर असल्याचे पहायला मिळत आहे. सध्या, शिंगणवाडी, डेरवण, गमेवाडी, कडववाडी, धायटी, पाडळोशी, जाळगेवाडी, माथणेवाडी, मसुगडेवाडी, तावरेवाडी, मुसळेवाडी परिसरातील शिवारात एका पेक्षा अधिक बिबट्याचे दर्शन होत आहे.