पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील नावडी वसाहत येथे बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ल्याचे सत्र सुरूच असून, शनिवारी पहाटे बिबट्याने एक शेळी ठार केली. जनावरांच्या शेडात घुसून बिबट्याने हा हल्ला केला.
नावडी वसाहत येथे शनिवारी पहाटे बिबट्याने एका शेळीवर हल्ला केला. येथील संजीवनी सुरेश नलवडे यांच्या जनावरांच्या शेडात घसून बिबट्याने हा हल्ला चढवला. यात शेळी ठार झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून जनावरांवर हल्ला करण्यात येत असून याठिकाणी मादी बिबट्या तिच्या पिलांसह असण्याची चर्चा आहे. नावडी वसाहत गावच्या पश्चिमेला कोयना नदी व ऊस पिकाचे क्षेत्र जास्त आहे. तसेच दाट वनराई देखील आहे. येथील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून अर्थिक उत्पन्नासाठी त्याला जोड म्हणून पाळीव जनावरे संभाळली जातात. त्यामुळे पाळीव जनावरांचे प्रमाण देखील जास्त आहे. याठिकाणी बिबट्याला पोषक वातावरण असल्याने त्यांचा अधिवास वाढला आहे.
याशिवाय दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत असून परिसरात त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेळी, कोंबड्या, कुत्र्यावरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहे. खाद्याच्या शोधात फिरणार्या बिबट्याचे व पिलांचे दर्शन नागरिकांना वारंवार होत आहे. बिबट्यांच्या अस्तित्वामुळे येथील पशुधन धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असून पाळीव जनावरांचा सांभाळ करायचा का नाही, असा यक्ष प्रश्न आता त्यांच्यासमोर आहे. वनविभाग अशा घटनांकडे गांभीर्याने पाहात नसल्याने स्थानिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वन विभागाने सापळा रचून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक शेतकर्यांनी केली आहे.