कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील तुळसण, शेवाळेवाडी- उंडाळे रस्त्यावर गेल्या आठवड्यापासून दिवसासह रात्री मोटारसायकल स्वारांचा बिबट्याकडून पाठलाग होत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
रविवारी रात्री मोटारसायकल स्वाराचा पाठलाग करून मागे बसलेल्या मुलावर बिबट्याने पंजा मारला. त्यात तो जखमी झाला. गावाच्या पर्वेकडील महादेव मंदिर परिसरात सोमवारी पहाटे बिबट्याने धुमाकूळ घातला.
कुत्री, वानरांच्या ओरडण्याने परिसरातील लोकांना जागे झाले. फटाके वाजवून बिबट्याला हुसकावून लावण्यात आले. सध्या परिसरात ऊसतोडणी सुरू आहे. ऊसतोड मजूर ही भीतीच्या छायेखाली आहेत. मोटारसायकल स्वारांत बिबट्याच्या हल्ल्यामुळे भीती आहे. त्यामुळे अनेकांनी भीतीपोटी या रस्त्यावरून ये-जा बंद केले आहे. सध्या या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. अचानकपणे बिबट्या दुचाकी किंवा चारचाकीसमोर उभा राहात असल्याने अनेकांना घामच फुटत आहेत.
बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी विभागातून होत आहे. विभागात सध्या पेरणीची धांदल सुरू आहे. उसाच्या तोडी सुरू आहेत. परिसरातील शेतकरी, महिला शेतात जाण्यासही घाबरत असल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. शेतात कामाला गेलेले मजूर जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.