एलसीबी पथकाने आंतरराज्य टोळीच्या अट्टल गुन्हेगाराला केले जेरबंद, चोरी, घरफोडीचे 50 गुन्हे उघड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र व कर्नाटक या 2 राज्यात तब्बल 41 आणि सातारा जिल्ह्यात घरफोडी, दरोडा, जबरी चोरी असे नऊ गुन्हे करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा कुख्यात गुन्हेगार सोन्या उर्फ सोमा उर्फ लाल्या ईश्वर भोसले (रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) याला फलटण तालुक्यातील सांगवी येथे जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली.पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत कारवाईची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर उपस्थित होते.

समीर शेख म्हणाले, कुख्यात आरोपी लाल्या ईश्वर भोसले हा कुख्यात गुन्हेगार ईश्वर भोसले यांच्या 27 मुलांपैकी सर्वात मोठा मुलगा आहे. अहमदनगर, बीड, नाशिक, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर व कर्नाटक राज्यामध्ये एकूण 41 गुन्हे या आरोपीने केले आहेत. आरोपी गेल्या वर्षभरापासून फरारी होता. सातारा जिल्ह्यातील तब्बल 9 गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. आरोपी फलटण तालुक्यातील सांगवी येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी येणार आहे, अशी टीप स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी नियोजनबद्ध तपासाला गती देऊन पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे आणि त्यांच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी वेशांतर करुन भोसले याच्यावर पाळत ठेवली होती. सांगवी गाव परिसरातील माळरानावर भोसले याला जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले. हा आरोपी कोणत्याही घरफोडीची अथवा चोरीची माहिती देत नव्हता. सातारा पोलिसांनी त्याच्याकडून 27 तोळे वजनाचे दागिने, 6 किलो चांदी व रोख पन्नास हजार व एक दुचाकी वाहन असा 26 लाख 35 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चोरीमध्ये मुद्देमालाची विल्हेवाट लावणारा भोसले याचा साथीदार सतीश भीमराव पवार वय 27 रा. दैठण, ता आष्टी, जि बीड यालाही सातारा पोलिसांनी अटक केली आहे.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये पडक्या माळरानावर येऊन तंबू ठोकायचा आणि बंद घरांचे रेकी करून त्या घराची घरफोडी करायची, अशी त्यांची गुन्हा करण्याची पद्धत होती. सदर आरोपी शारीरिक दृष्ट्या मजबूत असल्याने पोलिसांना सुद्धा त्याला जेरबंद करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. कटावणी, हातोडी, दुचाकी असे साहित्य त्याच्याकडून जप्त केले आहे. सदर आरोपीने आपल्या सख्या व सावत्र अशा 27 बहीण भावांची गँग तयार करून गुन्हे केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर 2022 पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे 285 गुन्हे उघड केले असून चोरीस गेलेल्या 612 तोळे म्हणजे सहा किलो 120 ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. या सोन्याची किमत 4 कोटी 26 लाख 84 हजार 900 रुपये आहे.