‘ड्राय डे’ दिवशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या हॉटेलवर LCB चा छापा, 13 लाख 23 हजाराचा मद्यसाठा जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ड्राय डे असताना दारूची चोरटी विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मिळाली. एलसीबीच्या पथकाने कराड ढेबेवाडी मार्गावरील विंग (ता. कराड) येथील हॉटेल रॉयल लँडस्केपवर छापा मारून १३ लाख २३ हजार रूपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा आणि रोकड जप्त केली. याप्रकरणी आनंदा सोपान माने (रा. पापर्डे, ता. पाटण), अजित नागेश खबाले, अक्षय आप्पासो वाघमारे (दोघेही रा. विंग, ता कराड) आणि रणजित दिनकर काटे (रा तडवळे, ता बत्तीस शिराळा, जि. सांगली) या संशयितांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सातारा जिल्ह्यात दारु विक्रिस बंदी (ड्राय डे) असल्याने चोरटी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी केली होती. त्या अनुषंगाने एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की, विंग (ता. कराड) येथील हॉटेल रॉयल लँडस्केपमध्ये चोरटी दारुची विक्री सुरू आहे. माहिती मिळताच त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि त्यांच्या पथकाला छापा मारून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे एलसीबीच्या पथकाने उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हॉटेल रॉयल लँडस्केपवर छापा मारला. हॉटेल मालकाच्या सांगण्याप्रमाणे ३ जण विदेशी दारुची विक्री करीत असताना आढळून आले. त्यांच्याकडून रॉयल स्टॅग, रॉमॅनो वोडका, व्हाईट मिसचिफ, डीएसपी ब्लॅक, डॉक्टर ब्रँडी, ब्लेंडर्स प्राईड, मॅकडॉवेल नं. १ अशा वेगवेगळ्या कंपनीचा १३,११, २०४ रुपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा आणि १२,६३० रुपये, असा एकुण १३,२३,८३४ मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक सचिन भिलारी, उपनिरीक्षक तानाजी माने, सहाय्यक फौजदार सुधीर बनकर, हवालदार साबीर मुल्ला, अतिष घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, मंगेश महाडीक, सनी आवटे, शिवाजी भिसे, प्रविण कांबळे, मोहन नाचण, सचिन साळुंखे, राजु कांबळे, मनोज जाधव, लक्ष्मण जगधने, अरुण पाटील, प्रविण पवार, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख, कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सचिन जगताप, नितीन येळवे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रीमती डॉ. उमा पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक नितीन जाधव, जवान विनोद बनसोडे, महिला जवान राणी काळोखे यांनी ही कारवाई केली.