सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अद्याप पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घाटरस्ते आता धोकादायक बनू लागले आहेत. साताऱ्याकडून कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटातील रस्त्यावर रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली. दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली होती ती आता सुरू झाली आहे.
सध्या या घाट मार्गातून चारचाकी तसेच दुचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या घाटातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ सुरू असते. कास, बामणोली तसेच अनेक गावांकडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने पर्यटक आणि प्रवासी या मार्गाचा सर्रास वापर करत असतात. त्यामुळे आता घाट रस्त्यातून प्रवास करताना वाहन धारकांना सतर्क राहावे लागणार आहे.
यवतेश्वर घाट मार्गावर दरड कोसळल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान, या ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती प्रशासनास मिळताच प्रशासनाकडून तत्काळ दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. पावसाची संततधार सुरू असल्याने घाट मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, या मार्गावर दरड कोसळल्याने पर्यटकांना कासकडे जाणारा मार्ग काहीकाळ बंद झाला होता तो आता पूर्ववत झाला आहे.