सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील चिंचणी येथील डोंगर क्षेत्रात असलेल्या धनगरांच्या कळपातील बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये कोकराचा मृत्यू झाला असून बकरी जखमी झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे चिंचणी परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याकडून होणाऱ्या हल्ल्याबाबत वनविभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी ग्रामस्थ व धनगर शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील चिंचणी गाव परिसरातील मेरुलिंग डोंगराच्या पायथ्याशी अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. अपरात्री शिकारीच्या आशेने हा बिबट्या वारंवार गावातही येतात. या बिबट्याकडून नागरी वस्तीतील पाळीव प्राण्यांसह जनावरांवर देखील अनेकवेळा हल्ले करण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या १५ दिवसात बिबट्याने रात्रीच्यावेळी हल्ले करत तीन कुत्री फस्त केली आहेत. यामुळे वस्तीसह गावातील ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्री गावाबाहेर शेत शिवारात धनगर अंकुश दडस हे आपल्या मेंढरे व बकऱ्यांच्या कळप हा लावला होता. यावेळी मंगळवारी रात्रीच्या सुमारास कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. ते उठून रात्री बाहेर गेले असता बिबट्या कोकरास घेऊन जाताना दिसला. त्यामुळे घाबरलेल्या धडस यांनी आरडाओरडा केला. कळपातील एक बकरा गंभीर जखमी झाल्याचे त्यांनी पाहिले.
बुधवारी सकाळी त्यांनी गावातील ग्रामस्थांना याची माहिती दिल्यानंतर गावचे सरपंच जितेंद्र सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. बिबट्याच्या हल्ल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर लवकरच घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई देऊ, असे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मेरुलिंगच्या डोंगरातील दाट झाडीमध्ये बिबट्याचा वावर असून येथील डोंगरात जाण्यास ग्रामस्थ धास्तवत आहेत. सध्या ज्वारीच्या पिकांचे रानडुकरे व माकडे नुकसान करत आहेत. याबाबत वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी चिंचणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
वन विभागाने पिंजरे लावून बिबटयांना पकडावे : जितेंद्र सावंत
चिंचणी येथे मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव राहतात. त्याच्याकडून मेंढपाळाचे काम केले जाते. चिंचणी गावासह शेतशिवार परिसरात एक मादी बिबट्या आणि दोन बछड्यांचा वावर आल्याचे गावातील शेतकऱ्यांनी देखील पाहिले आहे. आम्ही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून त्यांना बिबट्याकडून होत असल्याच्या हल्ल्याबाबत माहिती दिली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी लवकरच पंचनामा करून नुकसान भरपाई दिले जाईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती चिंचणी गावचे सरपंच जितेंद्र सावंत यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.