सातारा जिल्ह्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी खुशखबर; जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार ‘या’ तारखेला

0
25

सातारा प्रतिनिधी । सध्या लाडकी बहिणी योजना (Ladaki Bahin Yojana) राज्यामध्ये चर्चेचा भाग बनली आहे. आत्तापर्यंत या योजनेचे ६ हफ्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असून सातव्या हप्त्याकडे बहिणींचे लक्ष लागून राहिले आहे. लाडक्या बहिणींच्या सातव्या हप्त्याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच महत्वाची माहिती दिली आहे. “लाडकी बहिणी योजनेचा पुढील हप्ता हा 26 जानेवारीच्या आत महिलांना वितरित केला जाणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात ५ लाख १८ हजार ४५१ हुन अधिक लाडक्या बहिणींची संख्या आहे. या लाडक्या बहिणींसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी आहे.

लाडक्या बहिणींसाठी यापूर्वी डिसेंबर महिन्याचा हप्ता 25 ते 30 डिसेंबरदरम्यान वितरित करण्यात आला होता. या योजनेच्या लाभार्थ्यांना नियमितपणे निधी मिळावा यासाठी महिला व बालविकास विभागाने आर्थिक नियोजन पूर्ण केले असून, जानेवारी महिन्यासाठी अर्थ विभागाकडून 3 हजार 690 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याचा डीबीटी लाभ 26 जानेवारीच्या आत महिलांना वितरित केला जाणार आहे.

मंत्री अदिती तटकरे नेमक्या काय म्हणाल्या?

याबाबत बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, “नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याचा लाभ 26 जानेवारीपूर्वी पोहोचवण्याचे काम सुरू आहे. महिलांना तीन ते चार दिवसांत रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल. (Ladki Bahin Yojana) डिसेंबर महिन्यात 2 कोटी 47 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. जानेवारीतही हा आकडा जवळपास कायम राहील. मात्र, दुबार नावनोंदणी किंवा इतर योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांनी आपली नावे काढून घेतल्याने लाभार्थ्यांची संख्या किंचित कमी होण्याची शक्यता आहे.”

सातारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी

सातारा तालुका : ७६ हजार ४११ लाभार्थी
जावली तालुका : २० हजार ८४३ लाभार्थी
कोरेगाव तालुका : ५० हजार ५८० लाभार्थी
माण तालुका : ३४ हजार ८८५ लाभार्थी,
खटाव तालुका : ४८ हजार ८६८ लाभार्थी
वाई तालुका : ३६ हजार ७२५ लाभार्थी
खंडाळा तालुका : २३ हजार ८३२ लाभार्थी
महाबळेश्वर तालुका : १० हजार ५६९ लाभार्थी
फलटण तालुका : ५८ हजार ३७७ लाभार्थी
पाटण तालुका : ५९ हजार ११४ लाभार्थी
कराड तालुका : ९८ हजार २४७ लाभार्थी
एकूण लाभार्थी : ५ लाख १८ हजार ४५१
एकूण जमा झालेली रक्कम : ७७ कोटी ७६ लाख ७६ हजार ५०० रुपये