सातारा प्रतिनिधी । कोयना जलाशयावरील जल पर्यटनासाठी 50 कोटीचा आराखडा करण्यात आला असून संपूर्ण इको टुरिझम आराखडा आता 400 कोटींचा झाला आहे. या आराखड्यामुळे या परिसराच्या पर्यटन वृद्धीला चालना मिळत असतानाच स्थानिक लोकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
सदर प्रकल्पामुळे पर्यटनात वाढ होऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, पर्यटकांसाठी बोट, हाऊस बोट, स्कुबा डायव्हिंग, जेट स्की यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांना बोट, हाऊस बोट चालविण्यासाठी ट्रेनिंग देण्यात येणार आहे. स्थानिक बोट क्लबसाठी बोट मालकांचा काही स्वनिधी व शासनाकडील काही निधी यातून नवीन सोलर बोट त्यांना घेऊन देण्यात येणार आहेत. अथवा सोलर बोटसाठी लागणारे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना मोठ्या प्रमाणात बोटी उपलब्ध होऊन पर्यटक वाढल्यामुळे बोट व्यावसायिकांच्याही व्यवसायात वाढ होणार आहे. वाढत्या उत्पन्नाची संधी निर्माण होणार आहे.
याबरोबरच पर्यटन वाढल्यामुळे या ठिकाणी स्वयंपाकी, व्यवस्थापक, स्विमर्स यांचीही मोठ्या प्रमाणावर गरज पडणार आहे. पर्यटन आराखडा हा इको फ्रेंडली असल्यामुळे स्थानिक लोकांना झिप टेंट पुरविण्यात येणार आहेत. सफारीसाठी वाहने मोठ्या प्रमाणावर लागणार असल्यामुळे या ठिकाणी वाहन चालक, गाईड, तिकीट काउंटर संचालक अशा असंख्य प्रकारचे रोजगार निर्माण होणार आहेत. या ठिकाणी स्थानिक लोकांना व्यवसाय संधी उपलब्ध होणार असल्यामुळे नोकरीसाठी स्थलांतर करणारे पुन्हा आपल्या गावाकडे परततील. त्यांना गावातच व्यवसाय मिळेल आणि या सर्वातून त्यांचे जीवनमान उंचावेल. एकूणच या परिसराच्या पर्यटन वृद्धीला चालना मिळाल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे, असा विश्वासही जिल्हाधिकारी डूडी यांनी व्यक्त केला.