अनधिकृत उपसा सिंचन पंप काढून घ्या; अन्यथा कठोर कारवाई करू; कोयना सिंचन विभागाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । कोयना सिंचन व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृतपणे पाणी उचलत असलेल्या उपसा सिंचन योजनाधारकांनी आपले उपसा सिंचन पंप तात्काळ काढून घ्यावेत. अन्यथा त्यांच्यावर पाटबंधारे अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोयना सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे जुलै २०२४ अखेर पिण्याचे पाणी राखून ठेवूण व पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध मर्यादित पाण्यात सिंचन व्यवस्थापन करण्याचे धोरण आहे.

त्यामुळे कोयना नदी व त्यावरील निसरे व तांबवे को. प. बंधारे, वांग नदीवरील को. प. बंधारे, कृष्णा नदीच्या उंब्रज संगमापर्यंतचे तारळी नदीवरील तसेच उत्तरमांड नदीवरील को. प. बंधारे, महिंद ल. पा. तलाव व त्यावरील उत्तरवांग नदीवरील बनपुरी गावापर्यंतचे को. प. बंधारे, चाळकेवाडी ल.पा. चाफळ ल. पा. व त्यावरील उत्तरमांड नदी संगमापर्यंतचा गमेवाडी को. प. बंधारा येथील उपसा सिंचन योजनाधारक शेतकऱ्यांना पाणीबचतीचे आवाहन करण्यात आले आहे.

पाणी बचत होण्याच्यादृष्टीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा. कमी पाणी लागणारी भुसार पिके व मर्यादित प्रमाणात ऊस पिकास त्या त्या हंगामासाठी उपलब्ध पाणीसाठ्यानुसार मंजुरी देण्यात येणार आहे, असेही कोयना सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.