कराड प्रतिनिधी । गेली महिनाभर सातत्याने पडत असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खरिपाच्या व इतर पिकांच्या शेतीतील आंतरमशागतीच्या कामासाठी शेतकरी बाहेर पडला आहे. पाटण आणि कराड तालुक्यातील शेतशिवारे शेतकऱ्यांनी फुलली आहेत. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली असून धरणात 90.14 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
जूनमधील पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरूवात केली. त्यामुळे यंदा १०० टक्के पेरणी झाली आहे. तसेच मोठ्या प्रकल्पातही पाणीसाठा वाढला. जून ते जुलै या दोन महिन्यांचा विचार करता जिल्ह्यात ४४ टक्के अधिक पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख प्रकल्पात ८० ते ८७ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा झालेला आहे. सध्या या धरणात सुमारे १३५ टीएमसीहून अधिक साठा आहे.
आज सोमवारी सकाळपर्यंत काेयनानगर येथे 09 मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर नवजा येथे 19 आणि महाबळेश्वरला 14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात 7 हजार 407 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा 85.64 टक्के झाला आहे. धरणात पाण्याची आवक कमी आहे. तर सध्या धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
पिकांमध्ये भांगलणीची कामे सुरू
पावसामुळे पिकांमध्ये वाढ होऊ लागली आहे. ज्याठिकाणी ऊस लागण केली आहे, तेथील उगवून आलेल्या उसाला खत टाकणे, टॉनिक फवारणी करून ऊस पीक जोमाने कसे येईल, यासाठी सर्वतोपरी शेतकरी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. अजूनही म्हणावा तसा पाऊस उघडला नसल्याने शेतामध्ये जिथे जिथे भांगलणीची परिस्थिती आहे, त्या शेतातील ऊस, आले, भुईमूग, सोयाबीन, भात या पिकांमध्ये भांगलण सुरू आहे. चवळी, मूग, उडीद, धणा आदी पिके तर पावसाने हातची गेली आहेत. परंतु, उर्वरित पिके तरी चांगली यावीत, यासाठी शेतकरी कंबर कसून कामाला लागला आहे.
Koyna Dam
Date : 12/08/2024
Time: 08:00 AM
Water level: 2151’09” (655.853m)
Dam Storage:
Gross: 90.14 TMC (85.64%)
Live: 85.02 TMC (84.91%)
Inflow : 7,407 Cusecs.
Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 09/4280
Navaja- 19/5074
Mahabaleshwar- 14/4836