कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पावसाला सुरूवात झाली असून कोयना धरण पाणी साठ्यात हळू हळू वाढ होत आहे. दरम्यान धरणात 11.95 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पुर्वेकडे पावसाची अद्याप प्रतिक्षाच आहे. अशा स्थितीत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस संजीवनी ठरत आहे.
सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचे आगार समजला जातो. अर्धा अधिक जून महिना कोरडा गेल्यानंतर उशीरा का होईना पण आता पश्चिम भागात दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील कास, बामणोली, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात दमदार पाऊस कोसळू लागला असून महाबळेश्वरमध्येही पावसाचा जोर वाढत आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत असलातरी पूर्वेकडे पावसाची उघडझाप सुरू आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यातील खरीप पेरण्यांना वेग येण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे. सध्या येथील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
कोयना परिसरातील ओझर्डे धबधबा हा पर्यटकांचे आकर्षण ठरतो. पावसामुळे हा धबधबा फेसाळत कोसळू लागला आहे. हे विहंगम दृश्य कोयना परिसराच्या सौंदर्यात भर घालत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले नवजाकडे वळू लागली आहेत. कोयनानगर परिसरातील ओझर्डे धबधबा प्रवाहीत झाला आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.