पाटण प्रतिनिधी | यावर्षी ६ जूनच्या सायंकाळपासून जिल्ह्यात पावसाने सुरूवात केली. पूर्व आणि पश्चिम भागातही धुवाधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात सध्या मान्सून सक्रिय झाला असून गेल्या २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगर येथे ७१ तर नवजाला सर्वाधिक ९५ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोयना धरणात सध्या १५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळा भागात दररोजच पाऊस पडत आहे. यामुळे ओढे, नाले वाहू लागले आहेत. तसेच यामुळे भात लागणीलाही सुरूवात होणार आहे. तर पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यातही अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला.मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. सर्वत्रच पावसाने हजेरी लावली.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ९५ मिलीमीटर झाला आहे. तर महाबळेश्वर येथे २८ आणि कोयनानगरला ७१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर एक जूनपासून जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद नवजाला १९७ मिलीमीटर झाली. तर कोयना येथे १६६ मिलीमीटर पाऊस झालेला आहे.महाबळेश्वरचा पाऊस ९६ मिलीमीटर पर्यंत पोहोचला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचा पाऊस लवकर सुरू झाला आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पश्चिम भागातील प्रमुख धरणांत लवकरच पाणी आवकही सुरू होण्यास मदत होणार आहे.