कराड प्रतिनिधी । एसटीमधून प्रवास करणाऱ्या कोल्हापूरच्या महिलेच्या बॅगमधील सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना किणी वाठार ते कराड यादरम्यानच्या प्रवासात शुक्रवारी घडली. याप्रकरणी महिलेने कराड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्या विजय पाटील (रा. सैनिक टाकळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी याबाबतची फिर्याद दिली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील विद्या पाटील शुक्रवारी माहेरी कराड तालुक्यातील कार्वे येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्या दिराने त्यांना किणी येथे वाहनातून सोडले. त्यानंतर त्या कोल्हापूर ते बारामती जाणाऱ्या एसटीतून दुपारी कराडकडे येण्यासाठी निघाल्या.
त्यावेळी त्यांनी सोन्याचे दागिने व इतर साहित्य असलेली बॅग सीटखाली ठेवली होती. याचवेळी संबंधित सीटवर बसलेल्या दोन महिला उठून पाठीमागील सीटवर जाऊन बसल्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एसटी कराडमध्ये पोहोचल्यानंतर विद्या पाटील या भेदा चौकात उतरल्या. तेथून त्या दुसऱ्या एसटीने कार्वे येथे माहेरी गेल्या.
माहेरी पोहोचल्यानंतर त्यांनी बॅगमधील कपडे काढण्यासाठी बॅग उघडली असता बॅगमध्ये ठेवलेले दीड लाख रुपये किमतीचे तीन तोळे सात ग्रॅम वजनाचे गंठण, ४८ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तसेच २० हजार रुपये किमतीचे अर्धा तोळ्याचे टॉप्स चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत विद्या पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.