सातारा प्रतिनिधी | पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात असून अडीच लाख हेक्टरवर पूर्ण झाली आहे. हे प्रमाण ८७ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे यंदा चांगल्या पावसामुळे वेळेत पेरणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये भाताचे सुमारे ४४ हजार हेक्टर, खरीप ज्वारी ११ हजार, बाजरी ६० हजार ७३४ हेक्टर, मका १४ हजार ३६९, भुईमूग २९ हजार ४३५ आणि सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर राहणार असल्याचा अंदाज आहे, तसेच तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफुलाचे क्षेत्र अत्यल्प आहे.
मान्सूनच्या पावसावरच खरीप हंगाम घेण्यात येतो. पाऊस वेळेत आणि चांगला झाला तर पेरणी लवकर होते. यंदा पावसाला वेळेवर आणि दमदार सुरुवात झाली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीही वेळेवर सुरू झाली, तसेच पेरणीला वेगही आला होता. त्यामुळे आतापर्यंत ८७ टक्क्यांवर पेरणी पूर्ण झालेली आहे. सध्या २ लाख ५० हजार ७५१ हेक्टर क्षेत्रावर पीक आहे. यामुळे लवकरच पेरणी पूर्ण होणार आहे.
आतापर्यंत भाताची ५६ टक्के लागण झालेली आहे. २४ हजार ४९२ हेक्टरवर लागण करण्यात आली आहे. अजूनही पश्चिम भागात भात लागणीची कामे सुरूच आहेत, तर ज्वारीची ६ हजार ८१० हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण ६१ टक्के आहे. बाजरीची पेरणी ६४ टक्के झाली आहे. सुमारे ३९ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून यंदा या पिकाखालील क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.
मका पिकाची सर्वाधिक ९५ टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. १४ हजार ३६९ हेक्टर पेरणी झाली आहे, तर भुईमुगाची ९१ टक्के म्हणजेच सुमारे २७ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदाही सोयाबीन क्षेत्र वाढणार आहे. आतापर्यंत सुमारे ८७ हजार हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाणत ११६ टक्के झाले आहे. सोयाबीनला बऱ्यापैकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे असल्याचे दिसून येत आहे.
कोणत्या तालुक्यात किती टक्के पेरणी
सातारा तालुक्यात १८ हजार हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण ८६ टक्के आहे. जावळीत ११ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून ६१ टक्के प्रमाण राहिले आहे, तसेच पाटण तालुक्यातील ४० हजार ३६२ हेक्टरवर पेर झाली आहे. कराड तालुक्यात ९२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सध्या ३५ हजार हेक्टरवर पिके आहेत. कोरेगाव तालुक्यात ९० टक्के पेरणी झाली. आतापर्यंत १८ हजार ७०९ हेक्टरवर पिके घेतली आहेत. खटाव तालुक्यात ८२, तर माणमध्ये ९६ टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. खटावमध्ये ३७ हजार, तर माण तालुक्यात ३८ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीखाली आले आहे. फलटणला ७९, वाई तालुक्यात ८४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यात फक्त ५३ टक्के पेरणी झालेली आहे.