सातारा प्रतिनिधी | शिरवळ (ता. खंडाळा) हद्दीतील इन्टेक्स ट्रान्सपोस्टेशन सर्व्हिर्सेस प्रा.लि. या कपंनीच्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या पार्सलमधील महागड्या मोबाईलसह अन्य साहित्याची चोरी झाली होती. कर्मचारीच या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार निघाला असून पोलिसांनी कार्यालयीन कर्मचारी आणि वाहन चालकास अटक केली आहे. चोरीस गेलेल्या एकूण १२ लाख २० हजार रूपयांच्या मुद्देमालापैकी ६ लाख ७० हजार रूपये किंमतीचे ४१ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.
इन्टेक्स ट्रान्सपोस्टेशन सर्व्हिर्सेस प्रा.लि. या कपंनीच्या कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कामगार व चालकाकडून १२ लाख २० हजार ९५९ रुपयांच्या मोबाईलसह इतर साहित्य लंपास केल्याची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले होते. फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करत हा गुन्हा उघडकीस आणला.
या गुन्ह्यात कार्यालयीन कर्मचारीच मुख्य सुत्रधार निघाला. कर्मचारी आणि वाहन चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून ६ लाख ७० हजार रुपये किंमतीचे ४१ मोबाईल फोन हस्तगत केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संदीप जगताप, उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, उपनिरीक्षक शंकर पांगारे, अंमलदार संजय धुमाळ, सचिन वीर, जितेंद्र शिंदे, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, मंगेश मोझर, सुरज चव्हाण यांनी ही कारवाई केली.