हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वाराला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने चिरडले. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
संतोष रघुनाथ शिळीमकर (वय 43, रा. मंजाई असनी, ता. वेल्हे, जि. पुणे, सध्या रा. शिरवळ) असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झाला.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात साताराहून पुण्याकडे जाणाऱ्या दुचाकी (क्रमांक एमएच १२ एचवाय ६०८४) निघाली होती.
यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने (क्रमांक एचआर ५५ एएफ ९५२८) ने दुचाकीस जोराची धडक दिली. या धडकेत कंटेनर दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची घटना घडताच सातारहून येणारे वाहने अपघातस्थळी थांबली. त्यामुळे घाटात वाहतूक कोंडी झाली.
या घटनेतील कंटेनर चालक ललीतकुमार शेरसिंग (रा. तिहारजागीर ता. नबाबगंज बरेली (उत्तर प्रदेश ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेश इंगळे, वाहतूक पोलीस सणस यांच्यासह सहकाऱ्यांनी धाव घेऊन तात्काळ वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी कंटेनर वाहन ताब्यात घेतले असून मृत संतोष शिळीमकर हे सातारा येथील व्यंकिंज प्रा. लि. इंडिया या कंपनीत मॅनेजर म्हणून सातारा येथे नोकरीस होते. ते कामावरून साताराहून शिरवळकडे येताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची नोंद खंडाळा तालुका पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.