सातारा प्रतिनिधी | गेल्या आठवडाभरापासून कोसळत असलेल्या पावसामुळे सातारकरांची तहान भागवणारा कास तलाव हा पूर्ण क्षमतेने भरला आहे. सोमवारी तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कास तलाव परिसरात पर्यटन वाढावे, या दृष्टिकोनातून सातारा नगरपालिकेने कासच्या सांडव्यावर चांगल्याप्रकारे टप्पे देऊन तेथे पाण्याला भुशी डॅमचा फील दिला आहे.
दरम्यान, सातारा तालुक्यातील ठोसेघर पासून ३ किलोमीटर असणारा मालोबा लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणाच्या संडव्यावरून पडणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना खुणावत आहे. सातारा येथील कास तलाव भरल्यामुले तसेच सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने येथे आता जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांची रेलचेल आता वाढणार आहे. कास, बामणोली परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच आता कास तलाव भरल्याने या परिसरातील पर्यटन चांगल्या प्रकारे बहरणार आहे. कास पुष्प पठारावरून सोडव्याकडे न जाता पर्यटक घाटाई फाट्यावरून घाटाई मार्गे कास सांडव्याकडे पर्यटनास आले तर ते सोयीस्कर ठरणार आहे.
सातारकरांची चिंता मिटली ! कास तलाव झाला ओव्हरफ्लो… pic.twitter.com/E8YzgO0hn7
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 25, 2023
सध्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील धबधबे, तलाव भरून त्यातून ओसंडून पाणी वाहत आहे. पावसाळ्यात शनिवार आणि रविवार या दोन दिवसात अनेक पर्यटक फेरायला जात आहेत. आता कास परिसरात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना कास नजीकचा साताऱ्याचा भुशी डॅम, भांबवली वजराई धबधबा, मुनावळेचा केदारेश्वर धबधबा, एकीवचा पाबळ धबधबा, बामणोली, शेंबडी, मुनावळे या पर्यटन स्थळी पावसाळी पर्यटनासाठी जाता येणार आहे.