कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत मलकापुर नगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गावगुंडांकडून व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकारात वाढ झाली आहे. या दरम्यान, मलकापूर येथील एका दुकानदाराला हप्ता मागत त्रास देण्याचा प्रकार घडल्यानंतर सराईत गुंडांच्या टोळीस कराड शहर पोलिस ठाण्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. तसेच त्याच्याकडून रोकडही हस्तगत केली.
फजल उर्फ पप्पु लियाकत पठाण, शंतनु मानसिंग खराडे, रोहीत सुभाष पवार व मारुती सपेरा धोत्रे अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील 4 आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, श्री. राहुल राजेंद्र मासाळ यांनी कापड दुकानाकरीता मलकापुर ता. कराड शहरातील मलकापुर फाटा येथे नव्याने दुकानगाळा विकत घेतला. त्यांनी दुकान गाळयामध्ये आर. एम. मेन्सवेअर नावाचे कापड दुकान सुरू केल. यावेळी दि. 14.09.2023 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फजल उर्फ पप्पु लियाकत पठाण, शंतनु, रोहीत व मारुती पुर्ण नावे माहिती नाही यांनी सदर दुकानासमोर मोटार सायकलवरुन ‘येऊन राहुल्या बाहेर ये, तुला मस्ती आलीया, तुला आज घोडाच लावतो, माझ्या गँगला व मला तुझ्याकडून 5 हजाराचा हप्ता पाहिजे, चलं काढ हप्ता असे म्हणुन मोठ मोठयाने आरडोओरडा, शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली.
दहशत माजवुन दुकानात घुसुन हप्ता देत नसल्याचे पाहून स्वतःच्या खिशातील चाकु काढुन फिर्यादीस गंभीर दुखापत करण्याचे इरादयाने अंगावर वार करून दुखापत करण्याचा प्रयत्न केला व फिर्यादीचे खिशातील 1800 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच ‘पुन्हा आलो की राहीलेला हप्ता दयावा लागेल,’ असे सांगुन निघुन गेले. याची माहिती प्राप्त होताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी यांनी लागलीच डी. बी. प्रमुख राजु डांगे, पोलीस उपनिरीक्षक व डी. बी. टीमला आदेश दिला. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाने मलकापुर परीसरात पेट्रोलींग करुन माहितीच्या आधारे चारही फाळकुट दादांना शिताफीने ताब्यात घेतले.
फिर्यादी राहुल राजेंद्र मासाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फजल उर्फ पप्पु लियाकत पठाण, शंतनु मानसिंग खराडे, रोहीत सुभाष पवार व मारुती सपेरा धोत्रे यांना अटक करणेत आली आहे. आरोपींकडून गुन्हयात वापरलेले शस्त्र, मोटार सायकल व जबरीने चोरुन नेलेली रोकड हस्तगत करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि विभुते, पोलीस उप निरिक्षक आर. एल. डांगे, सफौ रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पो. हवा. शशिकांत काळे, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो. शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.