कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील तळबीड परिसरातील एका दाम्पत्याला गंडा घालणाऱ्या या टोळीकडून कराड शहर परिसरातील आणखी एका दाम्पत्यालाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. विवाहित जोडप्यांची फसवणूक करणाऱ्या या टोळीला सहकार्य करणाऱ्या सातारा शहरातील बहिण – भाऊ असलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इलियास राशिद शेख, रेश्मा राशिद शेख (दोन्ही रा. करंजे पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, परजिल्ह्यातील एका टोळीकडून अपत्य प्राप्तीचे आमिष दाखवून तळबीड परिसरातील एका दाम्पत्यास लाखो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी तळबीड पोलिसांनी राहूल धरमगिरी गोसावी उर्फ नारायण वैद्य (वय 32, रा. तिरंगानगर साक्री, ता. साक्री, जि. धुळे), अश्विन अशोक गोसावी (वय 34, रा. गोसावीवस्ती वैद्यवाडी, हडपसर पुणे, मूळ रा. वाकोत, ता. जामनेर जळगाव), शैलेश सुरेश गोसावी (वय 22, रा. तिरंगानगर साक्री, ता. साक्री, जि. धुळे) आणि देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय 32, सुशिलानगर, साक्री जि. धुळे) या चौघांना अटक केली होती.
दरम्यान, तळबीड परिसरात घटना घडल्यानंतर या टोळीतील संशयित राहुल गोसावी याने नारायण वाघ वैद्य असे आपले नाव सांगत टोळीमार्फत कराड शहरातील दाम्पत्याला तब्बल 72 हजारांची औषधे दिली होती. तसेच प्रवास खर्चाची रक्कम म्हणून 2 हजार रूपये स्वतंत्र घेतले होते. मात्र, काहीच फरक न पडल्याने दाम्पत्याने कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात तळबीड पोलिसांनी अटक केलेल्या चौघा संशयितांकडे चौकशी केली असता यामध्ये साताऱ्यातील दोन संशयितांनी सहकार्य केल्याचे उघड झाले आहे. इलियास राशिद शेख, रेश्मा राशिद शेख (दोन्ही रा. करंजे पेठ, सातारा) या दोघांनी सहकार्य केल्याचे उघड झाले असून पोलिसांकडून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे यांच्याकडून केला जात आहे.