घरफोडीतील चोरट्यास पोलिसांनी केली अटक; 82 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0
113

कराड प्रतिनिधी | काही दिवसांपूर्वी कराड ग्रामीण भागात घरफोडीचा गुन्हा होता. त्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात कराड ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून पोलिसांनी चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्याकडून 82 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला.

सचिन आनंदा माने (वय ३२ रा. तुळसण, ता. कराड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी महिला मुंबईला गेलेली असताना चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत साहित्य लंपास केले होते. याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उपअधीक्षक अमोल ठाकूर आणि पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गुन्हे शाखेला तपासाबाबत सूचना केल्या.

त्यानुसार पोलीस अंमलदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, मोहित गुरव, प्रफुल्ल गाडे हे तपास करीत असताना सोमवारी सायंकाळी पाचवड फाटा येथे एकजण पोत्यात साहित्य भरून संशयास्पदरित्या निघाल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये एलईडी टीव्ही आढळून आला. त्याच्याकडे कसून तपास केल्यानंतर चोरीची सायकल, गॅस सिलेंडर, शेगडी, शिलाई मशीन आणि दोन एलईडी टीव्ही तसेच १ हजार ४७० रुपयांची रोकड असा ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याबाबतची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. हवालदार उत्तम कोळी तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here