कराड प्रतिनिधी | तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ५८१ गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने ७२ जणांना मतदान पूर्ण होईपर्यंत (ता. २३) हद्दपार केले आहे. त्यांना तालुका पोलिसाच्या हद्दीत थांबण्यास किंवा प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
संबंधित सराईत गुन्हेगार हद्दीत मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तालुका पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील नागरिकांना आवाहन केले आहे, की विधानसभा निवडणुकीदरम्यान पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, त्याचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यानुसार ७२ जणांना हद्दपार केले आहे.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीत रेकॅर्डवरील गुन्हेगारांकडून सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी पाऊल उचलले आहे.