कराड प्रतिनिधी । कराड शहरातील पोपटभाई पेट्रोल पंप परिसरातून अज्ञात चोरटयांनी 15 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास स्कॉरपियो कार क्रमांक (MH 50 L 4876) ही चोरून नेली होती. त्या कारला पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून शोधून काढण्यात कराडच्या पोलिसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाण्यात गुरनं 755/2023 भादविसक 379 या गुन्हयामध्ये शरद विठठल माने (रा. मलकापूर, ता. कराड) वापरत असलेली व वेस्टास कंपनीच्या कार्यालयीन वापराची स्कॉरपियो कार क्रमांक (MH 50 L 4876) ही दि 14 जुलै रोजी रात्री 8 ते दि. 15 जुलै रोजीचे पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पोपटभाई पेट्रोल पंप कराड परिसरातून अज्ञात चोरटयांनी चोरून नेली होती.
याबाबत शरद माने यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर कराडच्या पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान, मिलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अंदाज घेत शोध घेतला. यावेळी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या हद्दीत निरा नदीच्या पलीकडे पुणे जिल्हयाच्या हद्दीत कार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ स्कॉरपियो कार ताब्यात घेत ती कराड शहर पोलीस ठाण्यात आणली.
त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाचे आधारे चोरटयांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व वरीष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारूती चव्हाण व त्यांच्या पथकाकडून केला जात आहे.