कराड प्रतिनिधी । कराड येथील मुजावर कॉलनीत पोलिसांनी बेकायदा कत्तलखान्यावर छापा टाकत आठ जनावरांची सुटका केली असून कत्तल केलेल्या जनावरांचे सुमारे २१० किलोचे अवशेषही जप्त करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी दोघांवर कराड शहर पोलिस झालेली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलमान सिकंदर शेख (वय ३४, रा. चांद पटेल वस्ती, कराड) व समीर जावेद नदाफ (रा. ईदगाह मैदानमागे, कराड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत प्राणी कल्याण अधिकारी वैभव किरण जारहावं यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुजावर कॉलनीमध्ये एका राहत्या इमारती खालील गाळ्यांमध्ये बेकायदेशीररित्या कत्तलखाना चालविला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक डी. एस. देवकर यांच्यासह अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
त्यानंतर पोलिस पथकासह प्राणी कल्याण अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांना संबंधित गाळ्यामध्ये आठ जनावरे बांधल्याचे आढळून आले. तसेच जनावरांचा आवाज येऊ नये, यासाठी त्यांचे तोंडही बांधले होते. दुसऱ्या गाळ्यात कत्तल केलेल्या जनावरांचे सुमारे २१० किलो अवशेष आढळून आले. तसेच सुरे, काणस, वजनी काटा आदी वस्तूही आढळल्या. पोलिसांकडून जनावरांची सुटका करून साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.