मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कराडात पोलिसांचे संचलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील अंतर्गत मार्गावरून बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कराड शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या पथकाने संचलन केले. यावेळी कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 1 पोलीस निरीक्षक, बारा पोलीस अधिकारी, 38 पोलीस अंमलदार वाहतूक, 1 आरसीपी पथक, 24 होमगार्ड यांचा संचलनात सहभाग घेतला होता.

बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कराड शहर पोलीस ठाण्यातून पोलिसांच्या संचालनास सुरुवात झाली. यावेळी कराड शहर पोलीस ठाण्यापासून सुरु झालेले संचलन शाहू चौक, दत्त चौक मार्गे डॉ. गुजर हॉस्पिटल समोरून मुख्य पोस्ट ऑफिस मार्गे गेले. तेथून पुढे अशोक चौक, अंडी चौक, भाजी मंडई, चांदणी चौक, जमा मस्जिद, मंगळवार पेठ मार्गे गौशा मस्जिद मार्गे पुढे पथकाने संचलन केले.

येथून पुढे पोलिसांचे पथक नगर पालिका चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुढे महात्मा फुले चौकात गेले. त्या ठिकाणाहून परत अशोक चौक मार्गे मुख्य रस्त्यावरून कराड शहर पोलीस ठाण्यात संचलनाचा शेवट करण्यात आला. येत्या काही दिवसात मोहरमचा सण येत आहे. त्यामुळे या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था रहावी. कोणीही याचा भंग करू नये. शहरातील शांतता कायम रहावी यासाठी कराड पोलिसांनी शहरातून संचलन केले.