कराड प्रतिनिधी । कराड येथील कार्वेनाका परिसरात शनिवारी भरदिवसा दुपारी युवकावर शस्त्राने वार करुन त्याचा खून केल्याची घटना घडली होती. हल्ल्यानंतर संशयित आरोपी हा फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होतो. दरम्यान, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण व डीवायएसपींच्या पथकाने रात्री २ वाजण्याच्या सुमारास मलकापूर येथून संशयितास ताब्यात घेऊन अटक केली.
शुभम रविंद्र चव्हाण (वय 22, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर मोबीन पैगंबर इनामदार (रा. कार्वेनाका, ता. कराड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडोली निळेश्वर येथील शुभम चव्हाण व कार्वेनाका येथील मोबीन इनामदार या दोघांच्या मध्ये मुलीच्या प्रकरणावरुन काही दिवसापूर्वी कराड येथील प्रीतिसंगम परिसरात वादावादीची घटना घडली होती. दरम्यान, शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शुभम चव्हाण हा पूर्वी झालेला वाद मिटवण्यासाठी कार्वेनाका येथे आला. यावेळी मोबीन व शुभम चव्हाण यांचे एकमेकांशी बोलणे झाले. बोलणे सुरु असताना दोघांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली. बाचाबाची सुरु असताना मोबीनने त्याच्याजवळच्या चाकूने शुभमच्या गळ्यावर, पाठीवर, पोटावर व कानावर सपासप वार केले.
अचानकपणे झालेल्या हल्ल्यात शुभमचा मृत्यू झाला. त्यानंतर मोबीन घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्या शोधासाठी कराड पोलिसांची तात्काळ दोन पथके तयार केली. तसेच ती शहरातील इतर भागात पाठवली. दरम्यान, रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मोबीन हा मलकापूर येथील एका शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोबीन याला रात्री दोन वाजता एका शेतातून ताब्यात घेतले.