कराड पोलिसांचा भोंगळ कारभार; 2 व्हीलर चोरीनंतर तरुण बनला डिटेक्टिव्ह, 4 दिवसांत अट्टल गुन्हेगाराला फिल्मी स्टाईल पकडलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । मागील काही दिवसांपासून कराड शहर आणि परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट पसरला आहे. मोबाईल, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून दिवसा ढवळ्या चोऱ्या होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. अशात कॉटेज हॉस्पिटल, कराड समोरून दुचाकी चोरीला गेलेल्या एका घटनेतून पोलिसांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. दुपारी १ वाजता जामिनावर सुटलेल्या एका अट्टल गुन्हेगाराने त्याच दिवशी दुपारी ३ वाजता दुचाकी लंपास केली. घटनेच्या काही मिनिटांमध्येच पोलिस स्टेशनला गेलेल्या तरुणाला पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही बंद असल्याचं कारण सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. शेवटी गाडी मालकाने स्वतः डिटेक्टिव्ह होत चारच दिवसांत चोराला फिल्मी स्टाईल शोधून काढून पोलिसांसमोर उभं केले. मात्र, तरी देखील पोलिसांना आरोपीकडून त्यानं चोरलेल्या गाडीचं काय केलं? कोणाला गाडी दिली? याची माहिती काढता आली नाही.

हाती आलेल्या माहितीनुसार, कराड शहरातील कॉटेज हॉस्पिटल समोरील साई टॉवर्स बिल्डिंगच्या समोर रस्त्याकडेला लावलेली रोहित सोमनाथ तडसल या तरुणाची स्प्लेंडर दुचाकी (गाडी नं एमएच ५० टी ६१८८) रविवार, १२ मे रोजी भर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास चोरट्याने पळवली. आपली गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच रोहित यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. घटना ताजी असल्याने तात्काळ सीसीटीव्ही चेक करावा, अशी विनंती केल्यानंतर सीसीटीव्ही बंद असल्याचं कारण पोलिसांनी दिल्याचं तक्रारदार यांचे म्हणणे आहे.

यानंतर पोलिसांकडून यावर लवकर काही पानं हालतील असं दिसत नाही हे लक्षात आल्यावर रोहित यांनी स्वतः डिटेक्टिव्ह होत चोरट्याला शोधायचं ठरवलं. सीसीटीव्ही जेथून मेंटेन केले जातात त्या ठिकाणाची माहिती काढून रोहितने तिथे धाव घेत कॉटेज समोरील सीसीटीव्ही चेक करण्याची विनंती केली. सीसीटीव्हीत चोर गाडी ढकलत घेऊन जाताना दिसून आला. यानंतर जवळच्या एखाद्या मॅकेनिक जवळ चोराने गाडीचे लॉक काढून घेतले असणार असा अंदाज लावून रोहित यांनी कॉटेज हॉस्पिटलच्या जवळच्या सर्व गॅरेज/मॅकेनिक यांचा शोध घेत त्यांच्याकडे विचारपूस केली. यावेळी यातील एका गॅरेज वाल्याने आपल्याकडे सदरील इसम आला होता आणि संशय आल्याने आपण त्याचा फोटोही काढून ठेवल्याचं सांगितलं.

आता चोराचा फोटो मिळवल्यानंतर रोहित यांनी सीसीटीव्ही व्हिज्यूल्स आणि फोटो दोन्ही पोलिसांकडे सुपूर्त केले आणि स्वतःही चोराचा तपास सुरु केला. आपल्या सर्व मित्रांना चोराचा फोटो पाठवून सदरील इसम दिसल्यास मला तत्काळ कळवा असा मॅसेज मित्रमंडळीत व्हायरल केला. यानंतर चारच दिवसांनी रोहित यांचे मित्र संतोष शिवणगे यांना सदरील इसम एका रिक्षात दिसला. त्याला गाडी चोरीबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे करत तेथून मी तुलाच या प्रकारात अडकवेन असा दम संशयिताने दिला. समोरचा माणूस ऐकत नाहीये हे लक्षात आल्यावर चोरट्याने तेथून धुम ढोकली. मात्र, संतोष कोळी याने त्याचा पाठलाग केला. यावेळी विशाल पवार, आकाश जाधव, ओंकार पवार, निखिल तावरे आदी रोहित यांचे मित्रही गोळा झाले. संशयिताने एका इमारतीच्या टेरेसवर जाऊन बाहेरून कडी लावून घेतली. मधल्याकाळात तरुणांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी आले. थोड्यावेळाने संशयिताने दरवाजा उघडला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

आता आपली गाडी भेटेल अशी आशा रोहित याला होती. पोलिसांना आपण आता आरोपीचं शोधून दिला आहे म्हटल्यावर पोलीस त्याच्याकडून गाडी कुठे आहे याची माहिती काढतील आणि आपली गाडी मिळेल, असे रोहितला वाटत होते. पण पोलिसांसमोर आरोपी कबुली द्यायलाच तयार झाला नाही. आपण गाडी चोरली तेव्हा आपण दारू प्यायलो होतो. त्यामुळे गाडी कुठंय हे मला माहिती नाही, असे आरोपीने म्हटल्याने त्याची रवानगी सातारा कारागृहात करण्यात आली आहे.

दरम्यान, शहरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेलया आहेत. पोलिसांनी काही आरोपीना पकडून मोबाईल, दुचाकी जप्त केल्याचा बातम्याही अलीकडे आल्या आहेत. मात्र, तरी या घटनेवरून कराड पोलिसांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. गाडी चोरीला गेल्यानंतर नागरिकांना स्वतः सिसिटीव्ह चेक करून चोराचा फोटो मिळवून तो व्हायरल करून आरोपीला पकडावे लागत असेल तर पोलीस काय करतात? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. शिवाय चोराला पोलिसांसमोर उभे करूनही जर चोरट्याकडून गाडी कोणाला विकलीय? याची माहिती पोलीस काढू शकत नसतील तर नागरिकांनी कोणाकडे जायचे? हा प्रश्न आहे.

पोलिस म्हणे शेवटी आम्ही काय देव नाही…

रविवार, १२ मे रोजी कराड शहरातील कॉटेज हॉस्पिटल समोरील साई टॉवर्स बिल्डिंगच्या समोरून दुचाकीच्या चोरीची घटना घडली. ज्याने दुचाकी चोरली त्या चोरट्यास दुचाकीच्या मालकाने पकडून ताब्यात दिले. आता पोलिसांनी चोरट्याकडेत्याने चोरलेल्या दुचाकीची चौकशी सुरु केली आहे. मात्र, आपण चोरलेली दुचाकी ही नेमकी कुठे ठेवलीय? कोणाला दिलीय हेच त्या चोरट्याला आठवण नसल्याचे पोलिस सांगत आहे. जोपर्यंत चोरट्याला आठवत नाही तोपर्यंत आपण इतर मार्गाने दुचाकीचा शोध करत आहोत. शेवटी आम्ही काय देव नाही ना… असे उत्तर पोलिस कर्मचाऱ्यांकडून दिले जात आहेत.

दुचाकी चोरीचा तपास सुरू : डीवायएसपी अमोल ठाकूर

दुचाकी चोरीच्या घडलेल्या घटनेबाबत कराडचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्याशी हॅलो महाराष्ट्रने संपर्क साधला. त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असताना त्यांनी या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. जे कोणी अधिकारी, पोलीस तपास करत आहेत त्यांना लवकरात लवकर दुचाकीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या असल्याचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.

आठवडाभरानंतर घटनास्थळी पंचनामा

कराड येथील कॉटेज हॉस्पिटल समोरून दुचाकी चोरीला गेलेल्या एका घटनेबाबत दुचाकी मालकाने त्याच दिवशी पोलिसात फिर्याद दाखल केली. दोन दिवसानंतर स्वतः चोरट्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतल्यानंतर आठवडाभरानंतर घटनास्थळी येऊन पंचनामा केल्याची माहिती दुचाकी मालक युवक रोहित सोमनाथ तडसल याने ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.