कराड प्रतिनिधी | हद्दपारीचा आदेश असताना देखील पिस्तूल घेवून घरी आलेल्या एकास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. कराड शहरातील रेठरेकर कॉलनीमध्ये पोलीस उपअधिक्षक कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी ही धडक कारवाई केली.
निशिकांत निवास शिंदे (रा. रेठरेकर कॉलनी, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेकी माहिती अशी की, कराड शहरातील रेठरेकर कॉलनीतील निशिकांत शिंदे याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तरीही हद्दपारीचे उल्लंघन करून तो त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, हवालदार प्रविण पवार, पोलीस नाईक सागर बर्गे, हवालदार चव्हाण यांच्यासह पथकाला याबाबतची माहिती दिली आणि कारवाई करण्याची सुचना केली.
उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलीस पथकाने मंगळवारी दुपारी निशिकांत शिंदे याच्या घरावर वॉच ठेवला. त्यावेळी अडीच वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून एकजण घरात घुसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने घरात घुसून संबंधिताला ताब्यात घेतले असता तो निशिकांत शिंदे असल्याचे उघडकीस आले. तसेच त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पिस्तूल आणि पॅन्टच्या खिशात दोन जिवंत राऊंड मिळून आले.
हद्दपारीचे उल्लंघन तसेच विनापरवाना पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून अटक केले. त्याच्याकडून ७५ हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल, १ हजार २०० रुपये किंमतीचे दोन जिवंत राऊंड व १० हजार रुपयांचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस नाईक सागर बर्गे यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.