कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हयासह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा आणि शिराळा तालुक्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही गावात येवून राहणाऱ्या गुंडाला कराड शहर पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून पकडले. अक्षय आनंदा नाटकर (रा. विरवडे, ता. कराड), असे संशयिताचे नाव असून त्यास अटक करण्यात आली आहे.
सतारा जिल्ह्यातील तडीपार गुंडांची माहिती काढून आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुसार कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक गणेश कड याच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या.
तडीपार गुंडांची माहिती घेत असताना अक्षय आनंदा नाटकर हा तडीपार असतानाही गावी येवून राहत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, हवालदार अमित पवार, आनंदा जाधव, महेश शिंदे हे शनिवार, दि. २९ रोजी सकाळी ८ वाजता विरवडे गावी गेले. पोलिसांना पाहून तडीपार गुंड पळून जावू लागला. मात्र, पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्यास अटक करण्यात आली आहे.
कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार आणि तडीपार गुंडांच्या हालचालीवर पोलिसांचे लक्ष आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी दिला आहे.