कृषी कार्यालय फोडणाऱ्या दोघा चोरट्यांना पोलिसांकडून अटक; 5 लाखांचा माल केला हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सैदापूर येथील कृषी मंडल अधिकाऱ्याचे कार्यालय फोडून ५ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली होती. या घटनेनंतर संबंधित चोरट्यांचा शोध घेत कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री दोघा चोरट्यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून पाच लाखाचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली.

अखिलेश सूरज नलवडे व आदर्श विनोद कोरे दोघेही (रा. गजानन हौसिंग सोसायटी ओगलेवाडी, ता. कराड) अशी अटक केलेल्या चोरांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार दि. 26 डिसेंबर ते बुधवार दि. 27 डिसेंबर दरम्यान सेदापूर येथील कृषी मंडल अधिकारी याचे कार्यालय चोरट्यानी धारदार एक्सब्लेडने कुलूप कट करून तोडले होते. कार्यालयातील लॅपटॉप, प्रिंटर व इतर कृषी साहित्य चोरीस गेले होते.

याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात कृषी मंडल अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. अधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डागे यांना संबंधित चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या. सूचनानंतर पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी चोरी झालेल्या संबंधित घटनास्थळी जाऊन पाहणी देखील केली. त्यावेळी त्या ठिकाणी चोरी करणाऱ्या चोरट्यांनी ज्या एक्सब्लेडने कार्यालयाचे कुलूप कट केले होते ते ब्लेड त्यांना सापडले.

त्यानंतर डीबी पथकाने एक्साब्लेडच्या आधारे अखिलेश नलवडे व विनोद कोरे या दोघाना गजानन हौसिंग सोसायटी येथून अटक केली. दोघांकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसानी जप्त केली. अधिक तपास महिला पोलीस नाईक डुबल करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शालेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डागे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशि काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, नहेरा शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय साडगे, अमोल देशमुख, वैभव पवार, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यानी केली.