कराड प्रतिनिधी | गणेशोत्सव कालावधीत रात्री दहापर्यंत ध्वनीक्षेपकाचा नियम काटेकोरपणे पाळला जातो. वर्षभर या नियमाला हरताळ फासला जातो. गणेश मंडळे सामाजिक देखावे सादर करू शकत नाहीत. त्यामुळे देखाव्यांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी कराडमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यावर या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत मंडळांची ही मागणी अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी मान्य केली.
कराडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. यावेळी पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, विजय पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री दहाच्या सुमारास कराड शहरात पोलिसांकडून देखावे बंद करण्यात आल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शेवटचे पाच दिवस गणेशोत्सव कालावधीत देखावे सादर करण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत वेळ होती.
मात्र, यंदा अखरेचे दोन दिवस देण्यात आले आहेत. पोलिसांकडून देखावे बंद करण्यात आल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने मंडळांची व्यथा जाणून घेत सहकार्य करावे, अशी मागणी रूपेश मुळे यांच्यासह अन्य गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली.
तर काही कार्यकर्त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली काही पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून घेतल्या जाणार्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पर्यावरण प्रेमींना केवळ गणेशोत्सव कालावधीतच नदीचे होणारे प्रदूषण दिसते का? वर्षभर पर्यावरण प्रेमी कोठे असतात ? नदीत अनेक ठिकाणी सांडपाणी वाहणारे नाले मिसळतात. बारा महिने यातून घाण पाणी मिसळत असल्याने नदी प्रदुषित होत नाही का? असा संतप्त प्रश्नही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
त्याचवेळी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी वर्षभर जल प्रदुषणाबाबतब रस्त्यावर उतरून ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत कार्यरत राहू असे सांगत केवळ गणेशोत्सव, दुर्गा उत्सव कालावधीत पर्यावरण प्रेमी का जागे होतात ? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी ईद ए मिलादनिमित्त काढली जाणारी मिरवणूक गणेशोत्सवानिमित्त पुढे ढकलली आहे. त्यामुळे कराडमधील हिंदू – मुस्लिम ऐक्य संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्शवत असल्याचे बापू बांगर यांनी सांगितले. त्याचवेळी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाच्या सूचना पाळत सहकार्य करावे, असे आवाहन केले.