कराड प्रतिनिधी | ड्रग्जची (एमडी) व गांजा तस्करीप्रकरणी कराड पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या पथकाने कारवाई केली असून सव्वालाखाचा सहा किलो गांजा जप्त केला आहे.
राहुल अरुण बडे (वय ३७, रा. पाण्याच्या टाकीजवळ, सोमवार पेठ), समीर ऊर्फ सॅम जावेद शेख (२४, रा. आदर्श कॉलनी, कार्वे नाका), तौसीब चाँदसाहेब बारगीर (२७, रा. अष्टविनायक मंगल कार्यालयानजीक, कार्वेनाका) यांना ड्रग्ज तस्करी, तर गणेश वायदंडे (२४, रा. बुधवार पेठ) व अशोक बिराजदार (५०, रा. रेठरेकर कॉलनी) असे गांजा तस्करीप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबात अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील टेंभू रस्त्यावर दि. ११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई झाली. एक जण ड्रग्ज विक्रीस येणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक ठाकूर यांना मिळाली. त्यांनी कार्यालयातील सहायक निरीक्षक अमित बाबर, सहायक फौजदार सपाटे यांच्यासह पथकाने त्याची खातरजमा केली. त्यांना श्री. ठाकूर यांनी कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने रात्री बाराच्या सुमारास हजारमाचीच्या हद्दीत ओगलेवाडी रेल्वे स्टेशननजीक तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पथकाने त्या तिघांनाही सापळा रचून ताब्यात घेतले.
त्यांची अंगझडती घेतली असता राहुल बडे, सॅम शेख दोघांकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत स्फटिकासारखे कण असलेली पावडर आढळून आली. तिन्ही संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. संशयितांकडे कसून तपास सुरू आहे. दरम्यान, अधिक तपासासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, फौजदार निखिल मगदूम यांच्या पथकाने दि. ११ फेब्रुवारीच्या रात्रीच दुसरी कारवाई केली. गोदाम परिसरात दोघांना अटक केली. गोदाम परिसरात दोघांना अटक केली. त्यात गणेश व अशोक दोघे संशयास्पद फिरताना आढळले. त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन पिशव्या होत्या. एका पिशवीत चार, तर दुसऱ्या पिशवीत दोन असा सव्वालाखाचा सहा किलो गांजा आढळून आला. दोघांनाही अटक केली.