कराड प्रतिनिधी । जेवण करून निघालेल्या एकास हजारमाची व ओगलेवाडी येथील तिघा जणांनी दुर्गा देवीची वर्गणी का दिली नाहीस, तुला मस्ती आली आहे का? असे म्हणुन शिवीगाळ, दमदाटी करुन कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी संबंधित टोळीतील दोघाजणांसह एका साथीदारांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.
१) सोमा ऊर्फ सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी (वय ३३ रा.हजारमाची, ओगलेवाडी, ता. कराड), टोळी सदस्य आरोपी २) रविराज शिवाजी पळसे (वय २७, रा.हजारमाची, ओगलेवाडी, ता.कराड) ३) आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी (वय १९, रा. हजारमाची, ओगलेवाडी, ता.कराड) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी सातारा जिल्हयामध्ये तसेच कराड परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करुन सराईत गुन्हेगार, टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायदयाकरीता संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये प्रभावी करावाई करण्याबाबत जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना सुचना दिलेल्या आहेत.
या प्रकरणी संबंधित आरोपींवर कराड शहर पोलीस ठाणे गुरनं १२१५/२०२३ भादविस कलम ३०७, ३८७, ३२६, ३२४, ५०४, ५०६, ३४, शस्त्र अधि.कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल होते. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये टोळी प्रमुख आरोपी सोमा ऊर्फ सोमनाथ अधिकराव सुर्यवंशी, टोळी सदस्य रविराज शिवाजी पळसे आणि आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी यांनी टोळीची दहशत निर्माण केली. आपल्या आर्थिक व इतर फायदयाकरीता संघटीतपणे गुन्हे केलेले असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी यांनी नमुद टोळी विरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती संकलित केली. तसेच त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने सदर आरोपींचेविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करीता पोलीस अधीक्षक यांचे मार्फतीने विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला.
विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.सुनिल फुलारी यांनी सदर टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचे कागदपत्रांचे अवलोकन करुन मोक्का प्रस्तावाची पडताळणी केली. तसेच सदर गुन्हयास मोक्का कायदयान्वयेची कलम वाढ करणेची परवानगी देवुन गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर यांच्याकडे देण्यात आला. नोव्हेंबर २०२२ पासुन ०९ मोक्का प्रस्तावामध्ये ११२ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली असुन ५८ इसमांविरुध्द हददपारी सारखी व ०१ इसमास MPDA कायदयान्वये स्थानबध्द करण्यात आलेले आहे.
मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, तत्कालीन पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे प्रदिप सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील कराड शहर पोलीस ठाणे, सपोनि संदीप शितोळे कराड शहर पोलीस ठाणे, पोउनि राज डांगे, पंतग पाटील, जी. पोउनि संजय देवकुळे, तसेच पो. हवा अमित सपकाळ स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस शिपाई आनंदा जाधव कराड शहर पोलीस ठाणे महिला पोलीस शिपाई सोनाली पिसाळ कराड शहर पोलीस ठाणे या पोलीस अंमलदारांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला आहे.