कराड प्रतिनिधी | सध्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. आचारसंहिता सुरू असताना वाहनातून विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांना खबऱ्याकडून मिळाली. माहितीच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेने बैल बाजार- मलकापूर रस्त्यावर गोकाक पेट्रोल पंपाजवळ एका बोलेरो गाडीला पाठलाग करून थांबवले. तपासणीमध्ये गाडीत १ लाख १६ हजार रुपये किंमतीची विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. दारू आणि चारचाकी गाडीसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त करून संशयित ऋषिकेश दिलीप कणसे (रा. शेणोली, ता. कराड) यास अटक केली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता काळात बेकायदेशीर धंद्यांवर तसेच बेकायदेशीर हालचालीवर लक्ष ठेवुन कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने उपनिरीक्षक पंतग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदीप कोळी, संग्राम पाटील अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
कराड डीबी पथकाने दारूची वाहतूक करणाऱ्या बोलेरोसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. pic.twitter.com/JIY23O4NqY
— santosh gurav (@santosh29590931) March 24, 2024
मलकापूर-बैलबाजार मार्गावरील गोकाक पेट्रोल पंपाजवळ एक संशयीत एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो (क्र. एम. एच. 11 ए. के. 2897) गाडीतून बेकायदेशीररित्या विदेशी दारुची वाहतुक करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी उपनिरीक्षक पंतग पाटील यांना कारवाई करण्याचे आदेशित केले. डी. बी. पथकाने गोकाक पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. मलकापुरकडुन कराडकडे येणाऱ्या बोलेरो गाडीला थांबवण्याचा इशारा केला. मात्र, न थांबता चालकाने गाडी नेली. डीबी पथकाने पाठलाग करुन गाडी थांबवली आणि संशयिताला ताब्यात घेतले.
गाडीची तपासणी केली असता १ लाख १६ हजार रुपये किमतीची विदेशी दारु आढळून आली. याप्रकरणी मुद्देमाल आणि बोलेरो, असा ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ऋषिकेश दिलीप कणसे याला पोलिसांनी अटक केली आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.