अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून कराडच्या महाविद्यालयातील तरूणाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून कराड येथील महाविद्यालयातील तरूणाने आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, सातारा येथील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढला.

श्रीराज मानसिंग पाटील (वय १७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. संबंधित मृत युवक सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शिरशी या गावातील राहणारा आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीराज पाटील हा कराड येथील एका कॉलेजमध्ये बी.फार्मसीचे शिक्षण घेत होता. रविवारी सकाळी तो वसतिगृहातून अचानक गायब झाला. रात्री उशिरापर्यंत तो वसतिगृहात परत न आल्याने कर्मचाऱ्यांनी त्याच्या घरी फोन करून तो घरी आला आहे का, याची विचारणा केली.

परंतु तो गावी आला नसल्याने कुटुंबीय तातडीने कराड येथे आले. कराड शहर पोलिस ठाण्यात रात्री अकरा वाजता कुटुंबीयांनी त्याचे अपहरण झाल्याची फिर्याद नोंदवली. त्यानंतर कराड पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्या मोबाइलवर त्यांनी फोन केला असता तो फोन उचलत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याच्या मोबाइलचे लोकेशन तपासले असता अजिंक्यतारा किल्ला दाखवले. त्यानुसार रात्रीच पोलिस अजिंक्यतारा किल्ला परिसरात आले. मात्र, तो सापडला नाही.

दरम्यान, साेमवारी सकाळी पुन्हा अजिंक्यताऱ्यावर शोध सुरू केला असता श्रीराजचा मृतदेह दरीत आढळून आला. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या पथकाने दरीत उतरून त्याचा मृतदेह दरीतून वर काढला. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्याने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.