कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे. या पथकाने 24 तासाच्या आत 9.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना देखील बेड्या ठोकल्या आहेत.
श्रेयस गणेश शिंदे (वय 22, रा. सोमवार पेठ ता. कराड) व अर्श शाहीद सुतार (वय 21, रा. शास्त्रीनगर मलकापुर ता.कराड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जानेवारी 2025 ते जुलै 2025 या कालावधीत सोमवार पेठ ता. कराड येथे फिर्यादी यांच्या घरातील पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटने प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांचे पथकातील पोलिस कर्मचारी गुन्ह्यांचा तपास करीत होते.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी श्रेयस गणेश शिंदे व अर्श शाहीद सुतार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कौशल्यपूर्व चौकशी केली असता. त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयात चोरीस गेलेला माल सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेली असून आरोपीकडुन एकुण 5 लाख 70 हजार रुपये किंमतीचे सुमारे 9.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकूर, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजु ताशिलदार, कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदिर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अशोक भापकर, सपोनि निलेश तारु, पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार, पो.ना सज्जन जगताप, अनिल स्वामी, संदीप कुंभार, पो. शि. धिरज कोरडे, मोहसिन मोमीन, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, अमोल देशमुख, आनंदा जाधव, शेलेश साखरे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.