कराड प्रतिनिधी । कराड शहरात एकीकडे चोऱ्या-लुटमारीच्या, पिस्तूल विक्रीच्या घटना वाढू लागल्या आहेत तर दुसरीकडे पोलिसांकडून आरोपींची धरपकड कारवाई केली जात आहे. अशात रविवारी मध्यरात्री एका डॉक्टरच्या घरावर दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली. तर सोमवारी रात्री लाच घेताना ACB च्या पथकाने एका नगरअभियंत्यासह एकास अटक केले. यानंतर पोलिसांनी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास विनापरवाना देशी बनावटीचे गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने कराडात आलेल्या युवकाला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल व मॅगझिन जप्त करण्यात आलेली आहेत.
मनोज राजेंद्र खांडेकर उर्फ एमके (वय 23, रा. जुळेवाडी, ता. कराड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून देशी बनावटीच्या गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. या विक्रेत्यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून सापळा रचला जात आहे. त्या सापळ्यात विक्रेतेही अडकत आहेत. दरम्यान, कराड शहरात देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना हि माहिती दिली.
पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी माहिती दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले. तसेच सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास कराड येथील ईदगाह मैदान परिसरात साई मंदिर परिसरात सापळा लावला. यावेळी संशयित ईदगाह मैदान परिसरात आला असता पोलिसांनी संबंधित युवकास ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडे असलेली सुमार ५० ते ६० हजार रुपये किंमतीची देशी बनावटीचे गावठी पिस्तूल ताब्यात घेतले. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, संजय जाधव, संतोष पाडळे, आनंदा जाधव, महेश शिंदे, संतोष लोहार यांनी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.