परजिल्ह्यातून दुचाकी चोरी करणारा सराईत चोरटा अडकला कराड पोलिसांच्या जाळ्यात; 8 दुचाकी जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विविध जिल्हयातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आज अटक केली. या कारवाईत पोलिसांनी संशयिताकडून एकूण 5 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत.

विक्रम रमेश सकट (वय 27, रा. बेघर वस्ती, सैदापूर, ता. कराड) असे पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेवून अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर यांनी दि. 15 रोजी झालेल्या गुन्हेगारांब्बत्च्या बैठकीत कराड शहरासह उपनगरात होणाऱ्या दुचाकी चोरीबाबत विशेष आढावा घेवून कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांना दुचाकी चोरीच्या गुन्हयाचा तात्काळ छडा लावण्याबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी व्युव्हरचना तयार केली. त्यानुसार केलेल्या कारवाईत कराड शहर गुन्हे प्रकटीकर शाखेने सैदापूर, ता. कराड, तसेच जिल्हयातील विविध भागातून चोरी झालेल्या एकूण आठ दुचाकींसह एका आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. दि. 16 रोजी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्हयाबाबत पथकाचे दोन गट तयार करून कराड शहर व उपनगरात गस्त घालण्याबाबत आदेशित केले होते.

सायकांळी 5.30 वाजण्याच्या सुमारास सैदापूर परिसरात गस्त करत असताना एक इसम संशयीतरित्या दुचाकीवर उभा असलेला दिसून आला. पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सदर इसमास ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याचे ताब्यातील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीस पोलीस ठाण्यात आणून पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील यांनी चौकशी केली. तसेच डी. बी. पथकाच्या मदतीने सदर आरोपीकडून सातारा, सागंली, कोल्हापूर जिल्हयातून चोरी झालेल्या एकूण आठ दुचाकी आरोपी नामे विक्रम रमेश सकट रा. बेघरवस्ती, सैदापूर, ता. कराड याच्याकडून जप्त केल्या.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पोलीस शिपाई अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केली.