पाटण प्रतिनिधी | सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दोन दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला कराड – चिपळूण महामार्ग अखेर खुला करण्यात आला. या मार्गावरील वाजेगाव येथील नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून रस्ता पूर्ववत केल्यामुळे गेल्या 48 तासांपासून अडकून पडलेली अवजड वाहतूक देखील सुरु झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यासह पाटण तालुक्याला रविवारी रात्रीपासून चांगलेच झोडपून काढले. या 48 तासांमध्ये कोयना परिसरात विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे रात्रीत ओढे, नाले तुडूंब भरून वाहू लागले. अचानक झालेल्या पावसामुळे कराड – चिपळूण महामार्गावरील वाजेगाव येथील पुलांच्या उभारणीसाठी तयार केलेल्या पर्यायी वळण रस्त्यावरून पाणी वाहून गेले. पर्यायी रस्त्यावरील भराव खचून सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
कराडकडून चिपळूणकडे जाणारी आणि चिपळूणकडून कराडकडे येणारी वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासी, स्थानिक व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तालुक्यातील महसूल- पोलिस प्रशासनाने महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीकडून तत्काळ येथील पुलाचे काम करण्याच्या सूचना केल्या. दिवसरात्र भराव पुलाचे काम करण्यात आल्यानंतर बुधवारी पुलावरून दोन दिवस जागेवर उभी असणारी वाहने मार्गस्थ झाली. सुरुवातीला पेट्रोल, डिझेल व गॅसची वाहने सोडण्यात आली. त्यानंतर भाजीपाला व धान्याची वाहतूक करणारी व शेवटी अवजड वाहने मार्गस्थ झाली.