पाटण प्रतिनिधी । गुहागर-विजयपुर राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६ ई वर रुंदीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यानच, सहा दिवसापूर्वी दि. १६ जूनला जोरदार पावसात या मार्गावरील पर्यायी रस्ताच वाहून गेला होता. यानंतर मुख्य रस्त्यावर तात्पुरती दुरुस्ती करून दि. १७ जुन रोजी हलक्या वाहनांना खुला करण्यात आला होता. मात्र, कराड- चिपळूण मार्गावर दि. २७ जुनपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंदच ठेवण्यात येणार आहे. आता या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे.
संभाव्य दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी कराड- चिपळूण मार्गावर दि. २७ जुनपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंदच राहणार आहे. केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरु आहे. अवजड वाहतुकीसाठी मार्गामध्ये बदल करण्यात आला असून वाहनचालकांनी नोंद घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले.
कोकणाकडे जाणारी वाहतूक ‘या’ मार्गे होणार
कराड, उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतूक कराड व उंब्रज येथून सरळ राष्ट्रीय महामार्ग क्र.चारवरुन पाचवड फाटा उंडाळे – कोकरुड मलकापुर आंबा घाट संगमेश्वर वरुन चिपळूणकडे जाईल. चिपळूणकडून कराड, उंब्रजकडे येणारी अवजड वाहतूकीबाबत सांगायचे झाले तर चिपळूण वरुन संगमेश्वर आंबा घाट, मलकापुर, कोकरुड, उंडाळे, पाचवड फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र.चारवरुन कराड, उंब्रज कडे जाईल.