कराड प्रतिनिधी । कराड शहरातील ड्रग्ज विक्री प्रकरणात गेल्या महिन्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 13 जणांना अटक केली होती. या प्रकरणात दोन परदेशी नागरिकांचाही समावेश होता. आता या प्रकरणात पश्चिम महाराष्ट्रातीलआणि कराडातील एका बड्या दारू व्यावसायिकाच्या मुलाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या व्यावसायिकाच्या मुलाच्या फोन कॉल रेकॉर्डिंगवरून काही धक्कादायक माहिती मिळवली आहे, ज्यामुळे त्याच्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यापूर्वी कराड शहर व परिसरामध्येही पोलिसांनी ओगलेवाडी येथे छापा टाकून (एमडी) ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना अटक केली होती. त्याचे धागेदोरे सुरूवातीला मुंबई त्यानंतर परदेशापर्यंत पोहचले होते. या प्रकरणी पोलिस तपास सुरू होता. आता या ड्रग्ज प्रकरणात पश्चिम महाराष्ट्रातील बड्या दारू व्यावसायिकाच्या मुलाचा सहभाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी अटक केलेल्या संशयितांबरोबर या व्यावसायिकाच्या मुलाचे कॉल रेकॉडींग पोलिसांना मिळून आल्याचेही सांगण्यात आले आहे. फोन कॉलमधून काही धक्कादायक माहिती पोलिसांना समजली असल्याने व या ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या दारू व्यावसायिकाच्या मुलाला ताब्यात घेण्याच्या हालचाली केल्या.
त्यानुसार पोलिसांचे एक पथक संबंधिताला ताब्यात घेण्यासाठी दारू दुकानावर गेले असता तो तेथे मिळून आला नाही. पोलिसांना ड्रग्ज प्रकरणात आपला सहभाग असल्याचा संशय आल्याने पोलिस आपल्यावर कारवाई करण्यासाठी येत असल्याचे समजल्यानंतर त्याने तेथून पोबारा केला. त्यामुळे दारू व्यवसायिकाच्या मुलाने पोलिसांना चकवा दिला असला तरी पोलिस त्याच्या मागावर आहेत. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. त्याचा आणखी एक साथीदारही यामध्ये असल्याने पोलिस त्याचाही शोध घेत आहेत. या प्रकरणातील काही मोठ्या धेंड्यांची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.