FRP प्रमाणेच ऊसदर जाहीर करावा; जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या सूचना

0
1

सातारा प्रतिनिधी | ऊसदराबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदारांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी एफआरपीप्रमाणेच कारखान्यांनी दर जाहीर करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली.

मागील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार कारखान्यांच्या प्रतिनिधींनी आपापल्या कारखान्यांच्या एफआरपीप्रमाणे दराची रक्कम सांगितली. त्यामध्ये २८०० ते ३२०० रुपयांपर्यंतचे आकडे सांगण्यात आले. शेतकरी संघटनांनी यावेळेस चार हजार रुपये प्रतिटन दर मिळावा, अशी मागणी केली होती; पण किमान ३५०० रुपये प्रतिटनापर्यंत दर कारखानदार जाहीर करतील, असे वाटत होते.

त्यामुळे शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी नाराजीचा सूर व्यक्त केला, तसेच किसन वीर, खंडाळा, जरंडेश्वर, अजिंक्यतारा, प्रतापगड कारखान्यांनी अद्याप दराबाबत घोषणा केलेली नाही. लवकरच हे पाचही कारखाने दर जाहीर करतील, असे सांगण्यात आले.

त्यामुळे आता इतर कारखान्यांप्रमाणे या चार कारखान्यांचा दर राहणार की जादा दर जाहीर करणार, याची उत्सुकता आहे. दरम्यान, ऊसदराबाबत आंदोलनाची भूमिका घेण्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट करून पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी सांगितले.

कारखान्यांनी जाहीर केलेली दराची रक्कम अशी..

कृष्णा कारखाना ३२००, सह्याद्री कारखाना ३२००, बाळासाहेब देसाई (मरळी) कारखाना २७००, श्रीराम जवाहर (फलटण) २८५०, रयत अथणी कारखाना ३२००, ग्रीन पॉवर (गोपुज) ३०००, स्वराज्य इंडिया २८५१, शरयू (कापशी) २८५०, जयवंत शुगर ३२००, माण- खटाव शुगर २९००, दत्त इंडिया २८५०, शिवनेरी साखर (रहिमतपूर) ३२००.