खासगी सावकाराकडून 1 कोटी 16 लाख 80 हजारांचे दागिने हस्तगत; आर्थिक व स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा आर्थिक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या वतीने नुकतीच एक धडक कारवाई करत सुमारे 1 कोटी 16 लाख 80 हजारांचे १४६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

संबंधित तपास करण्यात आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या तपासाबाबत अधिक माहिती दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांनी आरोपींकडून वेळोवेळी एकूण १ कोटी ९२ हजार रुपये रक्कम प्रथम २.५% व ती वाढवून १०% व्याज दराने घेतली होती. त्या रक्कमेस फिर्यादी यांचेकडून ६५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व ५० लाख रुपये किमतीचा प्लॉट तारण ठेवून घेतला होता.

फिर्यादीने सन २०१८ ते २०२३ दरम्यान आरोपीस मुद्दल रुपये १ कोटी ९२ हजार व व्याज रुपये १ कोटी १२ लाख ७७ हजार ५०० असे एकूण रुपये ३ कोटी ४ लाख ७७ हजार ५०० रुपये देवून देखील तारण ठेवलेले ६५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व प्लॉट परत दिला नाही. यानंतर फिर्यादीने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गु.र.नं.७०४/२०२३ भादविक ४२०, ५०४, ५०६, ३४ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ व ४५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.

तसेच फिर्यादी यांनी आरोपी यांचेकडून वेळोवेळी रुपये १९ लाख ९८ हजार प्रथम २.५% व ती वाढवून १०% व्याज दराने घेतली होती, त्या रकमेस तारण म्हणून आरोपीने फिर्यादी यांचेकडून ८१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे ठेवून घेतले होते. फिर्यादी यांनी सन २०१८ ते २०२३ दरम्यान आरोपीस व्याजासहित २० लाख ४८ हजार ९३१ रुपये वेळोवेळी देवूनही त्यांचे ८१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे त्यांना परत केले नाहीत म्हणून वगैरे दिले. फिर्यादीवरुन सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं.९१५/२०२३ भादविक ४२०, ४०६, ५०६ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ व ४५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.

पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नमुद दोन्ही गुन्हयांचे गांभिर्य लक्षात घेवून दोन्ही गुन्हयांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा सातारा यांचेकडे दिला होता. नमुद गुन्हयाचा तपास डॉ. वैशाली कडुकर, श्रीमती आश्लेषा हुले व श्री. अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.शिवाजी भोसले यांनी स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या मदतीने गुन्हयाचा तपास करुन गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रिक विश्लेषनाचा वापर केला. साक्षीदार यांचेकडे सखोल तपास करुन आरोपींच्या विरुध्द सबळ पुरावा प्राप्त केला व नमुद दोन्ही गुन्हयातील खासगी सावकार आरोपीकडे असणारे दोन्ही फिर्यादी यांचे एकूण १४६ तोळे वजनाचे चालू बाजारभावाप्रमाणे १ कोटी १६ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे हस्तगत करुन उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, श्रीमती आश्लेषा हुले व श्री.अरुण देवकर, पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलीस अंमलदार प्रमोद नलवडे, राजू मुलाणी, विकास इंगवले, सुरज गवळे, संजय मोरे, संतोष राऊत, अजित पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार अतिष घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, अरुण पाटील, अमित माने, गणेश कापरे, अमित सपकाळ, मोहन पवार, ओंकार यादव, रोहित निकम यांनी सदरची कारवाई केली असून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी नमुद अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.