पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष लावणार उपस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तयारी केली जात आहे. त्यात विशेष करून सातारा जिल्ह्याकडे भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे विशेष लक्ष लागले आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्यात पंतप्रधान मोदी साताऱ्यात येत आहेत. त्यामुळे भाजपकडून त्याची जय्यत तयारी सुरु केली जात आहे. तसेच पाटण मतदार संघमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांचा आहे. याकडे भाजपकडून लक्ष दिले जात आहे. यामध्ये खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट देखील काही मागे नाही. या गटाने सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आ. जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर अध्यक्षस्थानी राहणार राहणार असल्याची माहिती पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

पाटण येथे सकाळी ११ वाजता श्रीराम मंदिर येथे हा मेळावा होणार आहे. हा मेळाव्यास माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील, माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हा अध्यक्ष सुनील माने व पक्षाचे मान्यवर पदाधिकारीही उपस्थित असणार आहेत.

या मेळाव्याच्या माध्यमातून आ. जयंत पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची मोर्चेबांधणी व संघटना बांधणीच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा असणार आहे. तरी या मेळाव्यासाठी पक्षाचे सर्व आजी/माजी पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख, आजी/माजी जि‌.प. सदस्य, पं.स.सदस्य, आजी/माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक/नगरसेविका, आजी/माजी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजाभाऊ शेलार यांनी केले आहे.