सर्वांत जास्त ऊस गाळपात जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याने मिळवला दुसरा क्रमांक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्यातील सर्वांत जास्त उसाचे गाळप करण्याचा मान पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती अॅग्रो प्रा. लि. या कारखान्याने १८ मार्च अखेर मिळवला असून या कारखान्याने तब्बल २१ लाख ३५ हजार ७२१ मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. या साखर कारखान्याने १८ लाख ६० हजार २०० मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. तर १६ लाख ३४ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे

राज्यातील उसाचा गाळप हंगाम संपत आला असून येणाऱ्या एका आठवड्यात ते दोन आठवड्यामध्ये हंगाम संपण्याची चिन्हे दिसत आहेत. तर यंदा पावसाच्या कमतरतेमुळे उसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती पण नोव्हेंबर अखेर पडलेल्या पावसामुळे उसाच्या उत्पादनात वाढ झाली आणि परिणामी साखरेचेही उत्पादन वाढले आहे. दरम्यान, १८ मार्च अखेरच्या उस गाळप अहवालानुसार राज्यात १ हजार १२ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून १ हजार २८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

त्यापैकी सर्वांत जास्त उसाचे गाळप हे कोल्हापूर विभागात झाले असून तिथे २३२ लाख मेट्रीक टन गाळप झाले आहे. तर पुणे विभागात २२३ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. दौंड शुगर प्रा. लि. या साखर कारखान्याने १७ लाख २६ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे तर १६ लाख ३८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे

यंदा राज्यातील एकूण २११ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केले असून त्यातील १०६ सहकारी तर १०५ साखर कारखाने खासगी आहेत. सध्याच्या अहवालानुसार राज्यातील ७३ साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले असून इतर साखर १३८ साखर कारखाने चालू आहेत. तर खासगी साखर कारखान्यांनी सर्वांत जास्त गाळप केल्याचे चित्र आहे.