पाटण प्रतिनिधी । 11 डिसेंबर 1967 रोजीची ती रात्र ही काळरात्र ठरेल हे कुणाच्या ध्यानीमनी देखील वाटले नसेल कारण बरोबर आजच्या दिवशी 56 वर्षांपूर्वी कोयना परिसरातील महाप्रलंयकारी भूकंप आला होता. या दिवसाला आज 56 वर्षे पूर्ण होत आहेत. 11 डिसेंबर 1967 च्या काळरात्रीने हजारो घरे बेचिराख करत संसार उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. ती घटना आठवल्यास आजही थरकाप उडतो. आज त्या भूकंपाच्या भेगा बुजल्या असल्या तरी जखमा मात्र, अजूनही भळभळत आहेत. त्याचा ‘हॅलो महाराष्ट्र’ ने घेतलेला आढावा…
कोयना भागासह पाटण तालुक्यातील अनेक गावांना 11 डिसेंबर 1967 रोजी पहाटे 4 वाजून 21 मिनिटांनी 6.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरवून टाकले होते. कोयना भागासाठी ही काळरात्र ठरली. कारण या भूकंपाच्या धक्क्याने 185 जणांना आपला प्राण गमवावा लागला. सुमारे 40 हजारावर घरे बाधीत झाली. 936 पशुधन यामधे दगावले. तसेच अनेक ठिकाणी जमिनीना मोठ्या भेगा पडल्या. त्या काळरात्री झोपताना उद्याची नवी स्वप्न पाहणारे काळाच्या झोपेतून उठलेच नाहीत, तर अनेकांना या धक्क्याने जायबंदी केले. चवली पावली साठवत हाडाची काडं करून घामाच्या धारा वाहताना, पोटाला चिमटा घेत उभारलेला संसार निसर्गनिर्मित संकटाने क्षणात मातीमोल झाला.
1967 च्या भूकंपानंतर कोयना धरणाच्या भिंतीला काही ठिकाणी सूक्ष्म तडे गेले होते. तातडीचे उपाय म्हणून 1969 पर्यंत हे तडे इपॉक्सी रेझिनने भरून काढण्यात आले आणि धरणाचा सांडव्याजवळच्या उंच भागात पोलादाच्या तारा माथ्यापासून ते पायथ्यापर्यंत ओवून त्यांना ताण देण्यात आला. या तारा प्रतिबलित करून धरणाचा हा भाग शिवल्यासारखा एकसंध करण्यात आला.
1963 पासून कोयना भूकंपमापक केंद्रावर नोंदी घेण्यास सुरुवात
1963 सालापासूनच कोयना भूकंपमापक केंद्रावर भूकंपाच्या नोंदी घेण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत 1 लाख 21 हजार 256 हून अधिक धक्के या भागाने सोसले आहेत. 1967 सालच्या त्या विनाशकारी भूकंपाच्या भेगा कालांतराने बुजल्या, मात्र भूकंपग्रस्तांच्या जखमा आजही ताज्या व भळभळणाऱ्या आहेत.
दुर्घटनेनंतर तत्कालीन महसूलमंत्री गेले होते घटनास्थळी
या घटनेचे साक्षीदार असलेली वयोवृद्ध मंडळी आजही भूकंपांच्या भयावह आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू वाहतात. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राचे पोलादी पुरूष, तत्कालीन महसूलमंत्री, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी थेट तालुका गाठला. परिस्थितीची पाहणी करत जनतेस आधार देण्याचा प्रयत्न केला. बाधित कुटुंबियांसमवेत थांबून मायेची ऊब दिली. संसारोपयोगी साहित्याची मदत व हजारो नवीन घरांची उभारणी केली.