सातारा प्रतिनिधी । महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वाई पंचायत समितीच्या कृषी विभागाचे माध्यमातून तालुक्यातील लगडवाडी येथील शेतकरी शरद मोरे यांच्या वतीने बांबू लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शरद मोरे यांना मजुरीच्या रूपाने सहा महिन्यांमध्ये ४५ हजार रुपये इतके मजुरी मिळाली. संबंधित शेतकऱ्याच्या बांबू लागवड केलेल्या या ठिकाणची वाई पंचायत समितीची कृषी विभागाचे विस्तार अधिकारी अशोक भालेराव यांच्याकडून नुकतीच पाहणी करण्यात आली.
यावेळी कृषी अधिकारी शांताराम गोळे, पालक तांत्रिक अधिकारी राहुल बोराटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी विभागाच्या बांबू लागवड योजनेमधून एका हेक्टरसाठी ६ लाख ९० हजार रुपये इतके अनुदान असून तीन वर्षांचा संगोपनाचा खर्च शेतकऱ्यास प्राप्त होणार आहे. नंतर संपूर्ण शेतामध्ये येणारे उत्पादन शेतकऱ्यांनी स्वतः करता घेण्याचे आहे.
कृषी विभागाकडून बांबू लागवड करण्यासाठी अनुदान दिले जात असल्याने शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. वाई तालुक्यातील छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी किमान पाच ते दहा गुंठे या क्षेत्रावर बांबू लागवड केल्यास बांबू लागवडीपासून वर्षाकाठी ४० ते ५० हजार रुपये इतके उत्पादन घेणे शेतकऱ्यास शक्य होणार आहे.
या योजनेमध्ये शेतकऱ्यास रोपांचा पुरवठा जिल्हा परिषद मार्फत होणार असून खते आणि कीटकनाशके बुरशीनाशके इ. साठी तरतूद करण्यात आली आहे. यावेळी कृषी अधिकारी शांताराम गोळे म्हणाले की, जून जुलैमध्ये बांबूच्या प्रगत जातींची उदा. टूलडा, माणगा, मानवेल, मेशी इत्यादी बांबू लागवडीस योग्य अशा जातींची लागवड सुरू करावी.